मंगळवार, १९ मार्च, २०१३



“भातुकलीच्या खेळामधला राजा ......”
                                     - नवज्योत वेल्हाळ
घरी रंगकाम सुरु आहे .... आई म्हणाली अडगळीची खोली साफ करून ठेव .... मी कामाला लागलो .... एक एक करून सगळ्या जुन्या पिशव्या, पोती, वगैरे सामान बाहेर काढू लागलो .... सगळ्या सामानावर धुळीचं साम्राज्य पसरलं होतं.... त्यातील एक मोठी पिशवी झाडून साफ केली आणि सहज म्हणून उघडून मोकळी केली .... आणि .... माझ्यासमोर अस्ताव्यस्त पसरलं ते माझं ‘बालपण’ .... गेली अनेक वर्ष अडगळीत लपलेलं .... कुठेतरी हरवल्यासारखं .... माझी जुनी – बालपणीची खेळणी .... माझी भातुकली .... माझ्या गाड्या .... माझी दुर्बिण .... प्लास्टिक चे छोटे छोटे प्राणी .... फ्रीज .... अर्धवट तुटलेल्या पेन्सिलींची थोटकं .... भोवरा .... गोट्या .... रबरी चेंडू .... आणि असं बरंच काही .... पण त्या सगळ्यांत माझं लक्ष वेधून घेतलं ते माझ्या जुन्या लाडक्या ‘बाहुल्याने’ .... सोबतच्या छायाचित्रात दिसतोय ना .... तोच .... आमच्या भातुकली मधला आमचा ‘राजा’ .... कालपरत्वे( वयोमानानुसार :) ) त्याचा रंग बराचसा उडून गेला होता .... चेहरा निस्तेज दिसतं होता .... पायांना भेगा पडल्या होत्या (पायाचं प्लास्टिक थोडंसं फाटलं होतं) ....  तो दिसला आणि माझ्या डोळ्यांसमोर तरळू लागला आमचा भातुकलीचा डाव .... 
भातुकली म्हटलं कि आठवतं ते बालपण .... तारुण्याच्या उंबरठ्यावरचं आपलं पाहिलं पाऊल आपल्याला आपल्या निरागस बालपणापासून किती दूर घेऊन जातं ना .... मी , माझी धाकटी बहिण , बेबी ताई , सम्या - संदू , असे काही जण घरासमोरच्या फणसाच्या झाडाखाली आमचा भातुकलीचा छोटासा डाव मांडायचो .... छायाचीत्रातल्या बाहुल्याचं आणि कुठेतरी हरवलेल्या त्याच्या बाहुलीचं लग्न लावायचो .... आज ती बाहुली मला शोधूनही सापडत नव्हती .... काळाच्या ओघात ती कुठेतरी हरवली होती .... त्या दोघांची ताटातूट झाली होती .... माणसाचंही असंच होत असावं .... आयुष्याच्या प्रवासात आपल्यालाही अनेक माणसं भेटतात .... काही माणसं आपल्या जिवाभावाची बनून जातात .... पण मग आयुष्यात असा एखादा टप्पा येतो .... असं एखादं वळण येतं कि, ती माणसं आपल्यापासून दूर निघून जातात .... कधी कधी कायमचीच ..... त्या बाहुल्यालाही जर मन असतं तर ....? आता त्याच्या मनात काय चालू असेल ....? त्या दोघांनी मिळून माझं बालपण सुंदर सजवलं होतं .... आमचा भातुकलीचा डाव त्यांनी दोघांनी मिळून खूप सुंदर सजवला होता .... ते दोघंही आमच्या भातुकलीचे अविभाज्य घटक होते .... आज त्याची सखी - त्याची जोडीदारीण – त्याची प्रिय ‘राणी’ त्याच्या सोबत नव्हती .... त्यालाही आज ‘अधुरं – अधुरं’ वाटत असेल का ? त्याला पाहून जसं मला माझं बालपण आठवलं .... तसंच मला पाहून त्याला त्याचं बाहुली सोबतचं लग्न आठवलं असेल का ? लग्नानंतर आम्ही त्यांना भरवलेला साखरेचा घास त्याला आठवला असेल....? अडगळीच्या खोलीत गेली काही वर्षं त्याने एकटेपणात घालवली होती .... त्यांच्या झालेल्या ताटातुटीला तो मला जबाबदार तर धरत नसेल ना ...? जर मला त्याच्या बाहुलीची इतकी आठवण येत असेल तर त्याला तिची किती आठवण येत असेल ....! अडगळीच्या खोलीत एकांतात तो कधी रडला असेल ...? तिच्या आठवणीत त्याने कधी अश्रू ढाळले असतील ....? या क्षणी ती कुठल्या परिस्थितीत आहे ह्या विचाराने तो व्याकुळ होत असेल ....? त्याला खरंच मन असतं तर आज त्याच्या मनात किती असंख्य प्रश्न असतील ....! पण दुर्दैवाने तो माझ्यापाशी काहीच बोलू शकत नव्हता ....!
मी त्याला हातात घेतलं .... त्याला अंघोळ घातली .... स्वच्छ पुसलं .... पण त्याच्या आयुष्याचे उडून गेलेले रंग मात्र मी परत आणू शकत नव्हतो .... त्याची ‘राणी’ मी त्याला परत देऊ शकत नव्हतो .... मी आज पुन्हा भातुकलीचा डाव मांडलाय .... पण .... पण आज आमचा ‘राजा’ मात्र एकटाच आहे .... त्याच्या ‘राणी’ शिवाय हां डाव अधुराच असेल.... यापुढची त्याची ‘कहाणी’ कायम अधुरीच असेल ..... अधुरीच असेल....!!!!